सांगली महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती निदान केंद्राची उभारणी तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. जयंत पाटील यांनी सांगलीच्या विकासासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हा एक महत्वाचा निर्णय होता. या निदान केंद्राला देशपातळीवर स्कॉच अॅवार्ड पुरस्कारने गौरविण्यात आले असून ही सांगलीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी व्यक्त केले.
संजय बजाज म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाविकास आघाडीच्या काळात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्याचेवळी सांगली महापालिकेतही महाविकास आघाडीची सत्ता होती. कोरोनाची महामारी असतानाही महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आम्ही जयंत पाटील यांच्यामार्फत आणण्याचा प्रयत्न केला.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्राच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी काही मूलभूत निर्णय घेतले. यात अनेक विकासकामांचा समावेश आहे. यातील जयंत पाटील यांचे जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणे व महापालिकेच्या माध्यमातून मोफत, अल्प दरात रक्त चाचणी निदान केंद्र उभारणे हे निर्णय राज्य व देशपातळीवर गौरवले गेले. जिल्ह्यातील मॉडेल स्कूलची संकल्पना महायुतीने सरकारने राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला. तर महापालिकेच्या निदान केंद्राचाही आता देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. हा एका अर्थाने जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीचा गौरव असल्याचे संजय बजाज यांनी सांगितले.