जयंत पाटील यांचा 13 हजारांनी विजय;निशिकांत पाटील यांची निकराची झुंज

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अवघ्या १३ हजार २३ मतांनी विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवला. मात्र, हे घटलेले मताधिक्य त्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. आजवरच्या अनेक निवडणुकांशी तुलना करता महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी सर्व गटांना सोबत घेऊन दिलेली निकराची झुंज लक्षवेधी ठरली. जयंत पाटील यांना चांगली साथ देत विजयासाठी इस्लामपूर शहराने मोठा हातभार लावला. मात्र, आष्टा शहरासह कृष्णाकाठावर त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तर निशिकांत पाटील यांनी भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, खरातवाडी, बेरडमाची, दुधारी, समडोळी, कवठेपिरान आदी गावांत आघाडी घेतली. ग्रामीण भागात कोरेगावने जयंत पाटील यांना साडेआठशेचे मताधिक्य दिले.

जयंत पाटील यांना १ लाख ९ हजार ८७९ तर निशिकांत पाटील यांना ९६ हजार ८५२ मते मिळाली. नोटाला १ हजार २१ मते मिळाली. १६६ पोस्टल मते बाद ठरली. अन्य उमेदवारांना मिळून ४ हजार ६३३ मते मिळाली. जयंत पाटील यांना १ हजार ८३१ तर निशिकांत पाटील यांना ७१५ पोस्टल मते मिळाली. सकाळी ८ वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत जयंत पाटील यांनी ६९९ मतांची आघाडी घेतली. १० व्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. ११ व्या फेरीत निशिकांत ४६७ मतांचे मताधिक्य मिळाले. तोपर्यंत जयंत पाटील यांचे मताधिक्य १२ हजारांच्या पुढे गेले होते. त्यानंतर १३, १४ व १७ व्या फेरीत निशिकांत पाटील यांना काहीशी आघाडी मिळाली.

इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांना ७ हजारांच्या पुढे आघाडी मिळाली, तर आष्टा शहरात केवळ ८३ मते जादा मिळाली. आष्टा येथून जयंत पाटील यांना मिळालेले हे अल्प मताधिक्य धक्कादायक ठरले. इस्लामपूर शहरात निशिकांत पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे ते पिछाडीवर गेले. मिरज तालुक्यातील गावातूनही दोन्ही उमेदवारांत निकराची झुंज पाहायला मिळाली.