आष्टा येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत सुरेश निवृत्ती कुराडे (वय ५०, रा. सुभाष नगर, कुराडे वस्ती, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १५ रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान आष्टा तासगाव मार्गावर आष्टा हद्दीत सुरेश कुराडे व त्यांचे चुलत भाऊ सतीश कुराडे हे चालत निघाले होते.
यावेळी पाठीमागून अतुल चौगुले यांनी दुचाकी (क्र. एम.एच.१० डी. के. ८३९९) भरधाव वेगात चालवित सुरेश कुराडे यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना आष्टा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवार, दि. १७ रोजी जखमी सुरेश कुराडे यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सतीश प्रकाश कुराडे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दुचाकीचालक अ अरुण चौगुले (रा. अंकलखोप, ता. पलूस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.
