आम. जयंत पाटलांचा आक्षेप! लाडकीच्या जाहिरातीसाठी शंभर कोटी…वाढत्या कर्जाकडेही वेधले लक्ष

हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहिण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्यातील १०० कोटी रुपये जाहिरातीच्या खर्चासाठी ठेवण्यात आले आहेत.मात्र, योजना लोकप्रिय झाल्याने सरकार आले आता इतका मोठा निधी जाहिरातीसाठी कशाला? असा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी घेतला.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प ६ लाख १२ हजार २९७ कोटींचा असून त्यात अगोदरच २० हजार कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आलेली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यावर ९५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्यात. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अर्थसंकल्पात १ लाख ५० कोटी रुपयांची तूट निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यासाठी केलेल्या १ हजार ४०० कोटींच्या तरतुदीमध्ये १०० कोटी जाहिरात आणि १०० कोटी प्रशासकीय खर्चासाठी असल्याचे पुरवणी मागण्यात नमूद करण्यात आले आहे.