उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागांसाठी ६७ ईव्हीएम मशीन; प्रत्येक प्रभागात १ राखीव

उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ प्रभागांसाठी ६७, तर प्रभागनिहाय १ ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी शहरात ६७ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून ६३, तर क्षेत्रीय अधिकारी (झेडओ) अशा १० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६७ मतदान केंद्रांवर ३२० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

उरुण-ईश्वरपूर नगरपालिका क्षेत्रातील मतदार संख्या ६४ हजार २१५ आहे. ३२ हजार ३४० स्त्रिया आहेत. ३१ हजार ८७१ पुरुष, तर इतर ४ असे मतदार आहेत. ६७ मतदान केंद्रांवर ८० पोलिस, तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत आवश्यक पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.

दोन भरारी पथकांची नेमणूक केली आहे. शहरात नगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने ताकारी रस्ता, बहे, कामेरी, कापूसखेड रस्ता या चार ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक उभारण्यात आले आहेत. शहरात चार व्हिडिओ सर्वेक्षण पथके व एक व्हिडिओ पाहणी पथक नेमण्यात आले आहे. उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६७ ईव्हीएम मशीन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत.

दृष्टिक्षेपात उरुण-ईश्वरपूर नगरपालिका

मतदार – ६४ हजार २१५, स्त्री – ३२ हजार ३४०, पुरुष – ३१ हजार ८७१, इतर – ४., मतदान केंद्रे – ६७., ईव्हीएम मशीन – ६७., प्रभागनिहाय १ राखीव