इस्लामपूर शहरातील हनुमाननगर, बँक कॉलनी येथील महिलांनी इस्लामपूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पाण्यासाठी ताट, तांब्या, वाटी घेवून आंदोलन केले. पाणी आमच्या हक्काचे..नाही कुणाच्या बापाचे, पाण्याची टाकी उशाला..कोरड पडली घशाला, पाण्याची व्यवस्था झालीच पाहिजे अशा घोषणांनी नगरपरिषद परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सनी खराडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा करिष्मा जाधव यांच्यासह हनुमाननगर, बँक कॉलनी, ८० फुटी रोड परिसरातील महिला नगरपालिकेत दाखल झाल्या नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. देखभाल दुरुस्ती केली नाही. वारंवार तक्रार दिली तरीही ठोस पावले उचलली नाहीत.
काहींच्या घरी पाणी येत नाही पण पाणीपट्टी वेळेवर येते. अशा तक्रारी महिलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून दाखवली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आंदोलन स्थळी उपस्थित झाले. त्यांनी प्रशासन व आंदोलकांशी चर्चा करून लवकरच त्या ठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली जाईल असे आश्वासन दिले. प्रशासन वारंवार वेळकाढूपणा करत असल्याने आंदोलक महिलांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मालन थोरबोले, अलका जांगळे, अनिता शिरगावे, स्व- ती पाटील, अनिता जाधव, माया सूर्यवंशी, गीता शिंदे, वर्षा वडार, सुजाता पाटील, स्वप्नाली देशमुख, निलम देशमुख, स्वाती देशमुख, यशवंत जांगळे, आकाश शिंदे, शिव- जी शिंदे, ओंकार लके, अभिजीत शिंदे, अवधूत पाटील, शुभम माने, नागरीक उपस्थित होते.
