खातेवाटप आजच जाहीर होणार? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार

राज्यात आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला आहे. हिवाळी अधिवेशनही संपत आले असून खातेवाटप कुठं रखडलंय असा प्रश्न सर्वांना पडलाय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याचं समोर येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेआठ वाजता जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.

आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याची एकच चर्चा असताना ऐन अधिवेशनात खातेवाटप झाल्यासही आणखी नाराजी वाढू शकते, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेत असल्याचं बोललं जात आहे.

अधिवेशन संपल्यावर 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री, खातेवाटपाचं पत्र राजभवनला पाठवतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील, असं सांगण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही, असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे.