राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारण, गेल्या काही दिवसांतील गाठीभेटी अन् वाढत चाललेली जवळीक सध्या लक्षवेधी ठरत आहे.त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या घेतलेल्या भेटी चर्चेत आहेत. तर, आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलंय.
विशेष म्हणजे या भेटीदरम्याच्या फोटोमधील काका-पुतण्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील हास्य देखील सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ही केवळ सदिच्छा व वाढदिवस निमित्ताने असलेली भेट होती, असे सांगण्यात आले. पण, त्यानंतरही आमदारांच्या भेटींचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी असलेल्या रोहित पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षातील खासदारांच्या पार पडलेल्या बैठकीनंतरही अशी चर्चा सुरू झाल्याचे समजते. कारण, या बैठकीत खासदारांच्या मागे आगामी काळात तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच, पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. त्यामध्ये अजित पवारांसोबत जाण्याबाबत काहीजणांनी इच्छा व्यक्त केली, तर काहींनी महायुतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.