कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज यश मिळाले. इचलकरंजी मतदारसंघात डॉ. राहुल आवाडे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. सद्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार अनेक प्रश्नांवर बोलताना दिसत आहेत. कर्नाटक सरकारने पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्याला महाराष्ट्र सरकारने रोखावे त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंजूर मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शुक्रवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली. शासनातर्फे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय असे उपजिल्हा रुग्णालय सुरु आहे. या रुग्णालयास असलेली २०० बेडची मान्यता ३०० बेडची करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेली आहे.
त्याचबरोबर याठिकाणी मेडिकल कॉलेजही मंजूर झालेले आहे. परंतु ते सुरु होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतीसह अन्य प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्याला कारणीभूत अलमट्टी धरणाची वाढती उंची जबाबदार असल्याचे मत आहे.
एकिकडे महाराष्ट्र शासन कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची महापुराच्या विळख्यातून कायमस्वरुपी सुटका करण्यासाठी उपाययोजना करत आहे. परंतु कर्नाटक सरकारने यंदा पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेत याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जर अलमट्टीची उंची वाढविली गेली तर महापुराचा भयंकर मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने अलमट्टीची उंची वाढविण्यापासून कर्नाटक सरकारला रोखावे, अशी मागणीही आम. डॉ. आवाडे यांनी केली