एकाच मुलीसोबत बोलण्यावरून दोन मित्रांचा वाद टोकाला पोहोचला आणि एकाने गुन्हेगार असलेल्या मित्राला चाकूने भोसकले.यात रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान अल्लबक्ष विजापुरे (वय २४, रा. सुतार मळा) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अलोक माने (रा. शाहूनगर, गल्ली क्रमांक १०, चंदूर), रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहन लोखंडे (रा. नारळ चौक, इचलकरंजी) आणि तीन अनोळखी मुलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद जखमी इम्रान विजापुरे याने दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी इम्रान विजापुरे व संशयित माने यांची पूर्वीपासून ओळख आहे. माने इम्रानच्या मैत्रिणीशी संपर्कात होता. तो इम्रानबद्दल चुकीची माहिती सांगत असल्याने गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे मागील वादाचा राग मनात धरून अलोक माने व इतर चार साथीदारांनी इम्रानला धडा शिकवण्याचा डाव आखला.
इम्रान शनिवारी (ता. १९) रात्री तीन बत्ती चौकातील नूर पेंटर दुकानाच्या पाठीमागून जात होता. त्यावेळी संशयितांनी त्याला अडवले. माने याने तू अजून मस्ती करतोस, आता सोडणार नाही, असे म्हणत इम्रानला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहन लोखंडे व तीन अनोळखी मुलांनी त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडे याने लोखंडी पाईपने इम्रानच्या डाव्या मांडीवर प्रहार केला.
अचानक अलोक याने धारदार शस्त्राने इम्रानच्या पोटात भोसकून गंभीर जखमी केले. पाचही हल्लेखोर पसार झाले. रक्तबंबाळ होत जखमी इम्रान जागीच बेशुद्ध पडला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी इम्रानला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र गंभीर स्थिती पाहून त्याला डॉक्टरांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवले. सध्या इम्रानवर उपचार सुरू असून चार टाके पडल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.