सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला. राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शनिवारी विधानसभेत केली.हिंद केसरींचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले याची दखल घेत डॉ.देशमुख यांनी आज विधानसभेत याकडे लक्ष वेधले.
आमदार डॉ. देशमुख म्हणाले, राज्यात सात हिंदकेसरी तर २० महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. या पैलवानांचे सहा हजारांहून १५ हजार रुपये मानधन करण्याची घोषणा सरकारने एक वर्षापूर्वी केली होती. मात्र, गेल्या एप्रिलपासून हे मानधन दिलेले नाही. त्यामुळे हे मानधन सरकारने त्वरित द्यावे.
