पुलाची शिरोलीत सिम्बॉलिक स्कूलच्या फाळा वसुलीवरून वाद

शिरोली ग्रामपंचायतीचे फाळा वसुलीबाबत अभिनंदन होत असतानाच सिम्बॉलिक इंग्लिश स्कूलचा आठ वर्षांचा फाळा वसूल का केला नाही? असा सवाल सत्ताधारी समर्थकांनीच करत घरचा आहेर दिला आहे. ग्रामपंचायतीने सव्वा कोटीवर फाळा वसुलीसाठी धडक मोहीम उघडली आहे. थकबाकीदारांविरोधात लोकन्यायालयाचाही दरवाजा ठोठावला आहे. परंतु सिम्बॉलिक इंग्लिश मीडियम स्कूलचा गेल्या आठ वर्षांपासूनचा थकीत फाळा ग्रामसभेत दोन वेळा ठराव होऊनही का वसूल होत नाही, असा सवाल प्रशांत कागले, रामभाऊ बुडकर यांनी केला.

ही फाळा वसुली केली नाही तर जन आंदोलनाचा इशारा दिला. ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम यांनी २५ ऑगस्टच्या सभेत वरील दोघांच्या मागणीनुसार हातकणंगले शाखा अभियंता यांचा रिपोर्ट येताच कर वसुली करण्याचे ठरले होते. त्यानुसार बांधीव क्षेत्र २३४०९ फूट एवढे मोजमाप झाले, परंतु या मोजणीस सिम्बॉलिक स्कूलने आक्षेप घेतला. प्रत्यक्षात वापर क्षेत्रावर कर आकारणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार फेर मोजणी करावी, असा ठराव ग्रामसभेत केला. याबाबत गट विकास अधिकारी यांना स्कूल क्षेत्र मोजमाप यासाठी तारीख मागणी केल्याचा खुलासा केला. या घडामोडींमुळे सिम्बॉलिक इंग्लिश स्कूल फाळा वसुली विषय ऐरणीवर आला आहे.