इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत पात्रात पोहण्यासाठी गेला असताना पाण्यात बुडालेल्या देव सुशिल भाट (वय १८ रा. पुणे) याचा मृतदेह शनिवारी पहाटेच्या सुमारास मिळून आला. या बा ब त मिळालेली माहिती अशी, एका लग्न कार्याच्या निमित्ताने भाट व गागडे कुटुंबिय इचलकरंजीत आले होते. त्यांच्यातील देव भाट व हितेंद्र गागडे हे दोघे शुक्रवारी पंचगंगा नदी तीरावरील वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. नदीची पाणी पातळी कमी झाली असल्यामुळे देव, हितेंद्र व त्यांच्यासोबत आलेला विनोद माछरे असे तिघेही नदीपात्रात उतरले.
पण विनोद हा वाळूच्या ठिकाणी थांबला. तर देव व हितेंद्र पोहायला येत असल्यामुळे पाण्यात उतरले. काही वेळानंतर देव हा अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने बुडू लागला. तर हितेंद्रसुध्दा गटांगळ्या खात होता. त्याने आरडाओरडा केल्याने नदीकाठावरील लोकांनी धाव घेत हितेंद्रला पाण्याबाहेर काढले. पण प्रवाहामुळे देव वाहून गेला. नदीत मुलगा बुडाल्याची माहिती समजताच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे, व्हाईट आर्मीचे शाहीर बजरंग जावळे, आनंद पाटोळे, रतन पाटोळे, जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके यांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली. परंतु अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते.