बदनामी करण्याची भीती दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अक्षय सोमनाथ भूमकर (वय २८, रा. विटा, ता. खानापूर) या संशयिताला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बलात्काराचा हा प्रकार दि. २६ मे ते दि. २९ सप्टेंबर या कालावधीत घडला होता. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. पीडित महिला व अक्षय यांच्यात मैत्री होती. २६ मे रोजी ती महिला घरात एकटीच असताना अक्षय हा प्रसाद देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. त्यावेळी त्याने, तुझे फोटो माझ्याजवळ आहेत. ते तुझ्या बहीण-भावाला दाखवेन, अशी भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर तिला दुचाकीवरून नेऊन कोल्हापूर येथील लॉजवर विटा येथे नेऊन बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली तसेच शिवीगाळ केली, अशी फिर्याद पीडितेने दिली होती. संशयित अक्षय याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी अक्षयला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.