वाघवाडीतील नाल्याचे खोदकाम सुरु, सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल

वाघवाडी येथे अलीकडील काही वर्षांत अनेक व्यवसाय सुरू झाल्याने बाजारपेठ उदयास आली आहे. येथे तालुक्यातील नागरिक कापड खरेदीसाठी गर्दी करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. येथे काही ठिकाणी असलेले नाले बुजवून लोकांनी काँक्रिट टाकून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. येथे नाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते. येथील रस्ता नकाशावर २४ मीटर असताना अतिक्रमण होऊन तो अरुंद झाल्याचे दिसत आहे. 

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. इस्लामपूर ते चिकुर्डे रस्त्यावर वाघवाडी येथे सांडपाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यात खड्डे पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे नाल्यांची खोदाई सुरू केली आहे. परंतु येथील काही ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.