सांगली जिल्ह्यात हुतात्मा कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने वैभव नायकवडी गळीत हंगाम २०२४-२५ करिता गळीतासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०४ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी यावेळी दिली. वैभव नायकवडी म्हणाले, चालू वर्षी कारखान्याचे ६.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट्य आहे.

कारखान्याचे प्रतिदिनी ५१०० मे.टन प्रमाणे गाळप होत असून आज अखेर १,४०,९१० मे.टन गाळप होऊन सरासरी ११.६७ टक्के साखर उताऱ्याने १,४३,१७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ते पुढे म्हणाले, बाजारपेठेतील साखरेच्या किमतीवर साखर कारखानदारीचे अर्थकारण पुढे-मागे होत असते. प्रतिक्विंटल ३८०० रु. पर्यंत पोहोचलेल्या साखरेच्या दरात यंदाच्या गळीत हंगामात ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल घसरण होऊन तो दर ३३०० रु. प्रतिक्विंटल पर्यंत आला आहे.

एफआरपी व एमएसपी दरात तफावत राहत असल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करुन एमएसपी किमान ४२०० रूपये प्रतिक्विंटल करावा. इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करावी. साखर निर्यातीस परवानगी देऊन कारखान्यांना साखर निर्यात कोठा मिळावा. साखर कारखान्यांना ४ टक्के व्याजदराने वित्त पुरवठा व्हावा.

हे सर्व झाले तरच साखर उद्योग व उद्योगावर अवलंबून असणारे घटक सुखी होतील. केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ केली तरच कारखानदारी टिकेल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, कार्यकारी संचालक राम पाटील, कारखान्याचे खाते प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.