सध्या वातावरणातील बदलाचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. कधी ऊन, कधी थंडी, कधी पाऊस यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. अशातच अस्वच्छता यामुळे देखील अनेक वेगवेगळे प्रकारचे आजार डोके वर काढताना दिसत आहेत. इचलकरंजी शहरांमध्ये कचऱ्यांचे ढीग जागोजागी असल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होऊन अनेक नवनवीन आजार होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवन हे धोक्यात आलेले आहे. इचलकरंजी महानगरपालिकेने शहरातील कचरा उठावाचा ठेका फलटणच्या कंपनीला दिलेला आहे. नवीन कंपनीला ठेका दिल्यानंतर कामकाजामध्ये काहीतरी सुधारणा होणे अपेक्षित होते मात्र कामात कोणतीच सुधारणा नसल्याने शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग सध्या दिसू लागलेले आहेत.
तसेच घंटागाडी देखील दोन दोन दिवस भागात येत नसल्याने नागरिकांमधून संताप देखील व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून वेळेवर स्वच्छता व कचरा उठाव होत नसेल तर याचा जाब विचारायचा कोणाला अशी स्थिती निर्माण झालेली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेतील अनेक घंटा गाड्यांची दुरावस्था झालेली आहे. तर काही गाड्यांचे अपघात झाल्याचे दिसते. अनेकवेळा घंटागाडीत टाकलेला कचरा काही वेळेला रस्त्यावर पडत जातो तर अनेक घंटागाडीत कचरा अशा पद्धतीने भरला जातो की तो कचरा डेपोपर्यंत नेताना अनेक ठिकाणी वाऱ्याने मुख्य रस्त्यावर पडत जातो. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर महापालिका दखल घेणार का? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.