जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी इथे एक भारतीय सैन्यदलाची एक गाडी दरीत कोसळली आहे. या गाडीचा मेंढरच्या बलनोई परिसरात रस्ता चुकला होता.यानंतर ही गाडी खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत काही सैनिक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. सैनिकांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात आहे.
रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. आतापर्यंत ५ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काहीजण गंभीर जखमी असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या गाडीला अपघात झाला, त्यावेळी गाडीतून ८ ते ९ जवान प्रवास करत होते. यातल्या ५ जवानांचा मृत्यू झाला आहे, तर इतर जवानांवर उपचार सुरू आहेत.
ही गाडी नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेनं जात होती. 11 एमएलआय ही गाडी घोरा पोस्टजवळ जाताच वाहनाला अपघात झाला. ही गाडी जवळपास ३०० ते ३५० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच क्यूआरटी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्याला सुरुवात झाली.
भारतीय सैन्यदलाच्या व्हाइट नाईट कोर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिलं की, व्हाइट नाइट कॉर्प्सचे जवान पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर होते. त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून यात ५ जिगरबाज जवांनाचा मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. बचावकार्य सुरू आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.
मागील महिन्यात देखील जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात अशीच दुर्घटना घडली होती. ज्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता. तर अन्य एक जवान जखमी झाला होता. ही घटना कालाकोटच्या बडोग गावाजवळ झाली होती. ज्यात नायक बद्री लाल आणि शिपाई जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर दोघांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.