बागणी भागातील तरुणाई ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात, गावातून संतापाची लाट

अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. यामध्ये खून, मारामारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच अनेक अवैद्य धंद्यांना ऊत आलेला पाहायला मिळत आहे. जागोजागी अवैध धंदे राजेरोसपणे सुरू असलेले चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वाळवा तालुक्यातील बागणीसह भागात ऑनलाईन गेमिंग राजेरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे तरुणाई या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात अडकू लागली आहे. पोलिस यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावातून संतापाची लाट उसळली आहे.

बागणीसह सर्व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जुगार, मटका यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी संगणकावर ऑनलाईन जुगार खेळण्यात येत आहे. याला विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण बळी पडू लागले आहेत. यात पैशाची लूट होत आहे. ऑनलाईन जुगार जोरात सुरू असताना पोलीस विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी या ऑनलाईन जुगार केंद्र चालकांचे चांगलेच फावले आहे.

दरम्यान पैसे मिळण्याच्या हव्यासापोटी अनेक जण मोठमोठ्या रकमा गमावून अक्षरश: कर्जबाजारी झाले आहेत. भागातील अनेकजण ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी होऊ लागले आहेत. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन बागणीसारख्या गावात सुरु असलेली ऑनलाईन जुगाराची तसेच मटक्याचे व्यवसाय मुळासकट उपटून टाकण्याची मागणी सध्या या भागातून जोर धरू लागली आहे.