अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी यामध्ये प्रचंड वाढ होत आहे. अशाच एक प्रकार कबनूर येथे घडला. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे एका कनिष्ठ महाविद्यालयाबाहेर जुन्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाचा खून केला.हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पोटात भोसकल्याने प्रसाद संजय डिंगणे (वय १७, रा. जवाहरनगर) जागीच ठार झाला. त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील (२२ रा. जवाहरनगर) याच्यावरही दोन वार झाले. तो कसाबसा हल्लेखोरांच्या तावडीतून सुटला. मात्र, तो गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रात्री साडेनऊच्या दरम्यान घडला. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांन तपासाची सूत्रे तातडीने हलविली. त्यामुळे पाच संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील काही हल्लेखोर जर्मन टोळीतील एका कुख्यात गुन्हेगाराशी संबंधित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
दरम्यान, संबंधित महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर विद्यार्थी, पालकांची बाहेर पडतानाची घाईगडबड सुरू असताना हा खुनी हल्ला झाला. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडलेल्या प्रसाद डिंगणे व जखमी सौरभ पाटील याला त्यांच्या मित्रांनी दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात आणले; मात्र प्रसाद डिंगणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. गंभीर जखमी सौरभ याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील एकाच भागात राहतात. दोघे जिवलग मित्र आहेत. दोघेही सायंकाळी माजी विद्यार्थी म्हणून त्या स्नेहसंमेलनासाठी गेले होते. यावेळी त्यांचा काही जणांशी वाद उफाळून आला.
आसपासच्या मित्रांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. त्यानंतर पुन्हा वाद झाल्याने प्रसाद याने मित्र सौरभ पाटील याला बोलावून घेतले. पुन्हा वाद मिटवताना एकमेकांशी हुज्जत वाढत गेली आणि संशयित पाच जण सौरभ व प्रसाद याच्या अंगावर धावून आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पाचजणांनी दोघांना ओढून नेत मारहाण केली. धारदार हत्यार बाहेर काढत एकाने प्रसाद याच्या पोटात भोकसले आणि हातावरही वार केला.
या हल्ल्यात प्रसाद जागीच कोसळला. सौरभ याच्या पाटीत व हातावर वार झाले आहेत. यातून सौरभ बचावला आणि हल्लेखोर पसार झाले. स्नेहसंमेलन कार्यक्रमात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी याबाबतची माहिती पोलिस ठाण्याला कळवली. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.