वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराचा विकास हा दिवसेंदिवस अधिकच होत आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या वैभवात आणखीनच भर पडू लागली आहे. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत डॉ. राहुल आवडे याना प्रचंड मताधिक्य मिळाले आणि त्यांची आमदार पदी निवड झाली. आमदार यांनी इचलकरंजी शहराचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी योगदान दिले आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शहर व परिसरातील वाढते औद्योगिकरण पाहता सध्या असलेला वीज पुरवठा अपुरा पडत आहे.
तर वीजेच्या कमतरतेमुळे नवे उद्योग थांबले असल्याचे सांगत तातडीने वीज पुरवठ्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्याची मागणी केली होती. वस्त्रनगरी इचलकरंजी शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींसाठी अपुरा पडणारा वीज पुरवठा योग्य प्रमाणात आणि नियमित व्हावा यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशन, हाय व्होल्टेज सबस्टेशन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि बंच केबल टाकणे आदी कामांसाठी तब्बल १२५.८६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार तिळवणी (ता. हातकणंगले) येथे १०० मिलीयन व्होल्टेज अॅम्प्लीयर (एमव्हीए) चे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज (इव्हीएच) सब स्टेशन उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर शिवनाकवाडी (ता. शिरोळ) याठिकाणीही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सब स्टेशनसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून २०२६ पर्यंत हे काम मार्गी लागेल. शहापूर परिसरातील प्राईड पार्कनजीक २० एमव्हीएचे ८.८६ कोटी खर्चाचे हाय व्होल्टेज सब स्टेशन उभारण्यात येणार असून ते तीन महिन्यात सुरु होईल. सत्यराज टेक्स्टाईल पार्क याठिकाणी २० एमव्हीएच्या हाय व्होल्टेज सब स्टेशनसाठी १३.५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चार महिन्यात हे कामही पूर्ण होईल.
तारदाळ येथील सन्मती हायस्कूलनजीक २० एमव्हीए, तिळवणी येथे २० एमव्हीए, इचलकरंजीतील नाईक मळा (आवाडे सब स्टेशन परिसर) येथे २० एमव्हीए, शहापूरातील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे २० एमव्हीए आणि निरामय हॉस्पिटल परिसरात २० एमव्हीएचे सब स्टेशन होणार असून त्यासाठी २१.१२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. केवळ वीज उपलब्ध नसल्याने थांबलेले लहान-मोठे उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळणार असून वस्त्रनगरीच्या प्रगतीची घोडदौड वेगाने होणार आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले.