इचलकरंजी शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामध्ये अनेक नागरिक,
महिला, बालकांवर हल्ला करून जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत लचके तोडत एका घोड्याचा बळी घेतला. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या धर्तीवर पांजरपोळची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी माणुसकी फाडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.शहरात काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन फिरणाऱ्या एका घोड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याचे लचके तोडले होते.
निरामय हॉस्पिटल परिसरात घडलेल्या या हल्ल्यात घोडा गंभीर जखमी झाला होता. नागरिकांकडून या घटनेची माहिती समजल्यानंतर माणुसकी फाडेशनचे अध्यक्ष रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात लचके तोडल्याने घोडा गंभीर जखमी झाला होता. माणुसकी फांडेशनच्या वतीने त्या जखमी घोड्यावर उपचार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु गंभीर स्वरुपाच्या जखमांमुळे उपचार सुरु असताना घोड्याचा मृत्यू झाला.शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून जनावरांसह थेट माणसांवर, बालकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील प्रत्येक भागात वाढत चाललेल्या चिकन ६५ चे गाडे आणि चिकन व मटण विक्रेत्यांकडून ओढ्याकाठी किंवा गटारीत टाकल्या जात असलेल्या तुकड्यांवर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाण्यास न मिळाल्यास ते थेट समोर येईल त्याच्यावर हल्ला करत आहेत.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कार्यवाही काहीच दिसून येत नाही. म्हणून ज्याप्रमाणे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने पांजरपोळ निर्माण करुन त्याठिकाणी भटक्या जनावरांना ठेवले जाते. त्याच धर्तीवर इचलकरंजी शहरातही महानगरपालिकेच्या वतीने पांजरपोळसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी माणुसकी फाडेशनच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली असल्याची माहिती रवी जावळे यांनी दिली.