इचलकरंजी शहरात असलेला एसटी गँगचा म्होरक्या आणि काँग्रेसचा नेता संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार आहे. एक वर्षासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका खटल्याच्या साक्ष देण्याच्या निमित्ताने तो इचलकरंजी शहरात आला होता. पण शहरात दिवसभर त्याचा वावर होता. हद्दपारची कारवाई असतानाही तो शहरात बिनधास्तपणे सर्वत्र वावरला. इचलकरंजी काँग्रेस कमिटीत झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या आभार सभेला संजय तेलनाडे याने उपस्थिती लावली. त्यात त्याने भाषण ठोकले.
तो व्हिडिओ रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तडीपार तेलनाडे शहरातच फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हद्दपार कारवाईच्या नियमाचा भंग झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी कारवाई करण्याच्या सूचना शिवाजीनगर पोलिस ठाण्याला दिल्या आहेत.