इचलकरंजीचा पाणी प्रश्न तर जगजाहीर आहेच. अशातच पंचगंगा नदी प्रदूषण हा देखील मोठा मुद्दा सध्या उपस्थित आहे. पंचगंगा प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. इचलकरंजी शहरातील विविध नागरी वस्तीतून घेऊन जाणाऱ्या काळ्या ओढ्याचे देखील प्रदूषण जास्त आहे. त्यामुळे काळा ओढा आणि पंचगंगा नदी घाट स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
तसेच शहापूर खणीत निर्माण झालेले केंदाळ काढण्याचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. काळ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे ओढा परिसरात मोठी दुर्गंधी सुटून डासांचे प्रमाण देखील वाढत चाललेले होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नाही महानगरपालिकेच्या वतीने काळा ओढा स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
तसेच पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे नदीपत्रातील कचरा, गाळ काढण्याबरोबरच पंचगंगा घाटाची स्वच्छता करण्यात येत आहे. स्वच्छतेचे काम महानगरपालिकेने हाती घेतल्यामुळे शहरवासीयांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ही स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी राबवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.