वाळव्यातील रोमन व सरदार ही नवखी जोडी महाराष्ट्रात झाली प्रसिद्ध, दोन लाख, ढाल अन् हिंदकेसरीचा किताब पटकावला

प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मनोरंजन, कुस्ती, बैलगाडी शर्यती असे अनेक स्पर्धांच्या माध्यमातून लोकांचे करमणूक केली जाते. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. शर्यतीत महाराष्ट्रातून १२०० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात वेगाने अंतर कापत सरदार व रोमन या बैलजोडीने पुसेगाव हिंदकेसरीवर आपले नाव कोरले. वाघवाडी येथील गरीब कुटुंबातील सरदार या बैलाचे मालक आदित्य महादेव लाड व सुधीर वाघ ऊर्फ बंडा ड्रायव्हर असून रोमन या बैलाचे मालक प्रमोद वाघ, शरद लाड व उदय वाघ व बजरंग वाघ आहेत.

या शेतकऱ्यांच्या दावणीला गेल्या अनेक वर्षांपासून बैलांची जोपासना केली जाते. सरदार बैलाचा मालक आदित्य व रोमन बैलाचा मालक प्रमोद हे तर नवखे तरुण आहेत, तर बारक्या ड्रायव्हर सुरूल यांनी ही बैलगाडी पळविली. पुसेगाव मैदानात सरदार व रोमन बैलजोडी विजेती ठरल्यानंतर वाळवा तालुक्यातील व वाघवाडीच्या बैलगाडी शौकिनांनी जल्लोष साजरा केला. वाघवाडी येथे डीजेच्या वाद्यांमध्ये बैलांची मिरवणूक काढली. वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील सरदार व रोमन या बैलजोडीने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील राज्यस्तरीय मैदानात विजेच्या वेगाने धावत विजेतेपद पटकावले. दोन लाख सत्याहत्तर रुपये व ढाल व हिंदकेसरीचा मानाचा किताब या जोडीने पटकावला .या विजयाने रोमन व सरदार ही नवखी जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.