मुख्याधिकाऱ्यांचे घर फोडले चोरट्यांनी ; दागिन्यांवर मारला डल्ला

बऱ्याच ठिकाणी अलीकडे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच आता चक्क नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आलेले आहे.आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांचे बंद असलेले राहते घर चोरट्यांनी फोडून ७० हजारांच्या वीस ग्रॅमच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्यांच्या शेजारी असलेले दुसरे बंद घरही चोरट्याने फोडले आहे. या चोरीची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे पंचायत समितीजवळ असलेल्या उदयराज हॉटेलशेजारी भाड्याने खोली घेऊन पत्नीसोबत राहतात. २७ डिसेंबरला रजा काढून कामानिमित्त गावाकडे केडगाव (जि. अहिल्यानगर) येथे गेले होते. जाताना घराला कुलूप लावले होते.

मध्यरात्री चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला. या चोरीत दहा ग्रॅमचे सोन्याचे दोन कानातील झुंबे, पाच पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या असे ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. तसेच शेजारी राहणारे सचिन तवटे यांचेही बंद घर चोरट्यांनी फोडले आहे. सचिन तवटे गावी गेले असल्यामुळे त्यांच्या चोरीला गेलेल्या ऐवजाची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. या चोरीची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात केली आहे.