दोन दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत कारखाना कामगार, शेतकरी यांच्या बैठकीत माणगंगा लिलाव होऊ देणार नाही.ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना न्याय देऊ, अशी भूमिका मांडण्यात आली होती. याबाबत अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. समज-गैरसमज आणि अडचणीमुळे आमदारांनी हे वक्तव्य केले असेल पण आमच्याकडून काही आरोप-प्रत्यारोप नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
आटपाडी तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळावी व सहकार अबाधित रहावा, असा माझा खटाटोप आहे. कारखाना घेण्यासाठी मी स्वतंत्र संस्थेची नोंदणी पण केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असलेला माणगंगा साखर कारखान्याचा लिलाव निघाल्यास सहकार अबाधित ठेवत पैसे भरून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. बँकेचे पैसे आणि ताळेबंदानुसार देणी देखील भागवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कारखाना घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले डोकं म्हणतंय यात पडू नको पण मन सांगतंय हे करावं लागेल. द्विधा मनस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे दिव्य करण्याची तयारी केली आहे. तालुक्याचे लाल दिव्याचे स्वप्न जनतेच्या आशिर्वादामुळे पूर्ण झाले आहे. काम केले तर राजकारणात किंमत असते. हे मी काम करून दाखवून देईन. माणगंगेला पुन्हा उभा करण्याचे कठीण काम पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे. ते पूर्ण करेन ग्वाही देशमुख यांनी दिली.
