राज्यातील सर्वात मोठे असलेल्या सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. याच बरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. यामुळे येथे कृषी पर्यटन विकास करण्यासाठी राज्य शासनाने १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; अशी माहिती माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण मोठे आहे. यामुळे याठिकाणी एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते; या अनुषंगाने विकास करण्यात येणार आहे.
उजनी धरण मोठे असल्याने याठिकाणी बोटिंगची सुविधा देखील करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर पर्यटनस्थळ करण्याला मंजुरी देण्यात आली असून यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. कृषी, जल पर्यटनाला चालना मिळावी; यासाठी राज्य सरकारने उजनी धरणावर पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जानेवारी अखेर उजनी धरणामध्ये जल पर्यटन सुरू होणार आहे. ३३ बोटी खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.
जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. कृषी पर्यटनासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसाॅर्ट बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आता उजनी धरणावरील पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. अर्थात देवदर्शन घेतल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून हे पर्यटन उत्तम ठरणार आहे.