आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक नेते मंडळींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवार बाबतीत तर्कवितर्क तसेच चर्चांना उधाण आलेले आहे. खानापूर मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आटपाडी येथील देशमुख समर्थकांचे शिष्टमंडळ काल इस्लामपूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले. रात्री उशिरा या उमेदवारी संदर्भात सदाशिवराव पाटील यांनी तसेच आटपाडीच राजेंद्र अण्णा देशमुख यांनी जयंत पाटील यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन आपली उमेदवारी कशी प्रबळ आहे हे सांगितले. देशमुख यांनी आटपाडी तालुक्यांमध्ये हनुमंतराव देशमुख व जनार्दन झिम्बल यांना घेऊन संपर्क दौरा सुरू केला आहे.
विट्यातील सहा माजी नगरसेवकांनी राजेंद्र अण्णा देशमुख यांची गुपचूप भेट घेतल्याची ही चर्चा रंगली आहे. एकूणच तुतारी या चिन्हाला प्राधान्य असले तरी उमेदवारी बाबतीत अजूनही तर्कवितर्क आहे. या संदर्भामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडे असून या ठिकाणी महाविकास आघाडीकडून मशालीच्या चिन्हावरच उमेदवार उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांनी जनसंपर्काचा धडाका लावला आहे. गावभर भेटीचे नियोजन सुरू ठेवले आहे. त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यास जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे बाबर सेना उत्साहीत आहे.