‘विराज’ची उसाची पहिली उचल २८०० रुपये बँक खात्यात वर्ग करू; सदाशिवराव पाटील

अलीकडे ऊस दराबाबत सगळीकडेच नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच ऊस तोड मजूर मिळत नसल्या कारणाने शेतकरी अस्वस्थ आहेच अशातच ऊस दर योग्य मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. दर वाढीबाबत मागणी देखील केली जात आहे. अशातच आता विटा तालुक्यातील आळसंद येथील विराज केन्स कारखान्याकडून चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊस बिलाची पहिली उचल प्रतिटन २ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून त्यापोटी पहिला हप्ता दोन हजार ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

उर्वरित ३०० रुपये प्रतिटन होणारी रक्कम येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती विराज कारखान्याचे संस्थापक माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी दिली. अॅड. पाटील म्हणाले, विराज केन्स ॲण्ड एनर्जी या कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचे पहिले बिल २ हजार ८०० रुपये दिले होते. त्यानंतर दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपये दिले होते. आता चालू सन २०२४-२५ या गळीत हंगामात ऊस बिलाची पहिली उचल प्रतिटन २ हजार ५०० रुपये बँक खात्यात वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयेप्रमाणे रक्कम आठवड्यात बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. यंदा गळीत हंगामात दीड लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.