अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात भरमसाठ वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक तिहेरी अपघात विटा पारे रस्त्यावर घडला आहे. मंगळवारी रात्री पारे येथील आतिश उर्फ रोहन वायदंडे आणि त्याचे अन्य चार जण मित्र दोन पल्सर गाड्यावरून विटा या ठिकाणी जेवणासाठी आलेले होते. जेवण झाल्यानंतर ते परत पारेगावच्या दिशेने जात असताना विटा पारे रस्त्यावरील शिवसागर मंगल कार्यालयाच्या गेटजवळ एक पंक्चर झालेली उसाची ट्रॉली रस्त्यावर उभा करण्यात आली होती. या ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचा रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात उसाने भरलेली ही ट्रॉली दिसून येत नव्हती.
काही वेळानंतर विट्याहून पारेकडे निघालेल्या अतिश उर्फ रोहन वायदंडे वय 29 याच्या पल्सर गाडीची उसाच्या ट्रॉलीला धडक झाली. या अपघातात अतिश वायदंडे यांच्यासह सुरज चंदू सावंत, विजय सुभाष साठे हे गंभीर जखमी झाले. दुसरी पल्सर गाडी येऊन त्याच ट्रॉलीवर आदळली. यामध्ये मोटरसायकल वरील अजित बाळासो माने व अजित बाळासो साळुंखे हे देखील पारे येथे राहतात हे देखील जखमी होऊन तसेच पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. या तिहेरी अपघातामध्ये अतीश वायदंडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तसेच अन्य चार जणांवर विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणाऱ्या अपघाताची मालिका सुरू असून नागरिकांमधून याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.