२०२४ यावर्षी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत आपणाला राजकीय उलथापालथ पहायला मिळाली. अनेक राजकीय समीकरणे देखील बदलली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याबाबतचं थेट वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं.जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीत एक मंत्रीपद रिक्त ठेवलं आहे.
अधिवेशनानंतर जयंत पाटील काही आमदारांना घेऊन अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा आशयाचं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जयंत पाटील यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पत्ता कट होणार असल्याचं आता बोललं जात आहे.येत्या ९ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्याच बोललं जात आहे. जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत विविध जागांवर जयंत पाटलांनी इलेक्टीव्ह मेरीट लक्षात न घेऊन तिकीट दिल्याचा आरोप पक्षातूनच केला जात आहे. एकीकडे, जयंत पाटील महायुतीत सामील होणार असल्याचा दावा केला जात असताना, शरद पवार गटात नेतृत्वबदलाच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता, पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे. पक्षफुटण्याच्या शक्यतेमुळेच जयंत पाटलांचा पत्ता कट केला जात आहे, अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ९ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? हे बघणं महत्वाच ठरणार आहे.
