आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, महादेव पाटील, साहेबराव पावणे, जयवंत सरगर, यु.टी जाधव, नवनाथ पुकळे, संदीप ठोंबरे, रणजित ऐवळे, विष्णूपंत अर्जुन, सुरेश काळे, जगन्नाथ कोळपे यावेळी उपस्थित होते. राज्यातील आठरा पगड जाती जमातींसाठी प्रथमच स्वतंत्र बजेट अधिवेशनात मांडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेल, खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण निश्चित बदलेल. विकासाच्या बळावर यापुढील राजकारण असणार आहे अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे दहा टक्के वाल्यांचे काहीच शिजत नाही अशी टीका त्यांनी केली. युवकांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. राजकारणात प्रचंड ताकद आहे. राजकारणच परिवर्तन करू शकते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्व ताकतीनशी लढवून चार जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी जनतेने ताकद द्यावी. ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की, आमचा वीस वर्षाचा संघर्ष हा जनतेच्या बळावरच होता. यापुढील संघर्ष हा जनतेसाठी असेल. महादेव पाटील म्हणाले, पडळकर बंधूच्या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे. ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी साथ द्या.