आमदार सुहास भैया बाबर यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधाण….

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यानंतर निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर पंधरा दिवस मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मतभेद सुरू होते. अखेर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आता सध्या मंत्रीपद मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

आमदार गोपीचंद पडळकर विधानसभेत जनतेतून मोठ्या मताधिक्याने निवडून गेले आहेत. धनगर समाजातील ते प्रमुख नेते मानले जातात. त्याशिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांना प्रमुख मंत्री पदाची संधी मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून चर्चा आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटातून खानापूरमधून सुहास भैया बाबर हे आमदार झाले आहेत. दिवंगत नेते अनिल बाबर यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र त्यांचे जानेवारी 2024 मध्ये निधन झाले. बाबर यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जिल्ह्यातील आठ आमदारांमध्ये सुहास भैया बाबर हे सर्वाधिक म्हणजेच 78 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे सुहास बाबर यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सध्या जोर देत आहे.