उद्या हातकणंगले, इचलकरंजी भागांतील छोट्या यंत्रमागधारकांच्या २४ संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल…..

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचेच लक्ष आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणूकीचे वेध लागले आहे. पक्ष प्रमुखांची आता निवडणुकीची लगबग पहायला देखील मिळत आहे. लोकसभा निवडणूक, पावसाळा आणि विधानसभा निवडणूक अशा तीन कारणांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली होती. न्यायालयीन निर्णयाव्यतिरिक्त अन्य काही संस्थांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले होते, तरीही निवडणुकांना स्थगिती मिळाल्यामुळे सर्वच प्रक्रिया जैसे थे राहिली.नुकताच ३१ डिसेंबरला स्थगिती संपली.तीन जानेवारीला नवीन आदेश निघाल्यामुळे निवडणूक कार्यक्रमासाठी आता सहकारी कार्यालयात धावाधाव सुरू झाली आहे.

इचलकरंजी, हातकणंगले परिसरातील काही छोट्या, पण सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या २४ निवडणुकांचे बिगुल उद्या वाजण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण ८७३ संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आता लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ५५९ संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती होती. ३१४ संस्थांना निवडणुका नव्याने घ्यावा लागणार आहेत. अशा एकूण ८७३ संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा आता उडण्यास सुरवात होणार आहे. यामध्ये ‘अ’ प्रवर्गातील संस्थांच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश नाही.

जिल्ह्यात लोकसभेला वेगळा तर विधानसभेला वेगळा निकाल पुढे आला. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आता कोणाचा वरचष्मा राहणार याबाबत उत्सुकता आहे. स्थानिक गट टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांना गाव आणि तालुका पातळीवरील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व द्यावे लागते. त्यामुळेच संस्था लहान आणि गाव पातळीवरील असल्या तरीही चुरस तयार होते.

गतवर्षात तीन वेळा स्थगिती मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा नारळ आता फुटला आहे.उद्यापासून हातकणंगले, इचलकरंजी भागांतील छोट्या यंत्रमागधारकांच्या २४ संस्थांची निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी कालावधीत एकूण ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील सुमारे ८७३ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.