पत्रकार दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेक पत्रकारांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात येतो. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, पत्रकारांकडून समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान केला जातो हा आदर्शवत उपक्रम आहे.
इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो, ही बाब भूषणावह नाही. याबाबत पुढील काळात राज्य शासनाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. इचलकरंजीकरांचे पुढे कौतुक करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, हे शहर कला, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून या शहराला भारताचे मँचेस्टर असे संबोधले जाते, हे या शहराने औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. यापुढेही इचलकरंजी शहरातील इतर व्यक्ती क्रीडा, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहराचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास अस्तित्वात असलेले कायदे व नियमात बदल केले जातील तसेच यावेळी पत्रकारांसंदर्भात मोलाचे वक्तव्य करताना उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पत्रकारांसाठी नवीन निवासी संकुलांची उभारणी करणे अथवा अस्तित्वात असलेल्या निवासी संकुलांचा पुनर्विकास करणे व अशा प्रकारे या संकुलामध्ये पत्रकारांचा समावेश करणे हा शासनाच्या ध्येय धोरणात अंतर्भूत असून, याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करेन. या कार्यक्रमाला इचलकरंजीचे आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती.
