कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुका या न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून आहेत. मात्र नेत्यांनी निवडणुका कधीही लागल्या तरी त्याची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.नव्या आमदारांच्या सत्काराच्या निमित्ताने गावभेटी, प्रभागवार भेटी सुरू आहेत. नेत्यांच्या गाठीभेटीतून त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे; तर आमदार झाल्यावर काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत नेत्यांनी संपर्क मोहीम वाढविली आहे. कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना नेते न चुकता उपस्थित राहात आहेत. एका बाजूला महायुतीत घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतही पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे.
इचलकरंजी येथे महापालिका झाली असून या महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे पहिली सत्ता कोणाची, पहिला महापौर कोण याची चर्चा आतापासुनच सुरू झाली आहे. इचलकरंजीचे आमदार भाजपचे राहुल आवाडे आहेत; तर इचलकरंजीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली आहे.
इचलकरंजीत सध्या भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून या माध्यमातून त्यांची निवडणूक तयारी सुरू आहे. आमदार पी. एन. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यक्रमात लोकसभेत विजय मिळाला. मात्र विधानसभेतील पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे नेते एका व्यासपीठावर आले होते.