आमदार जयंत पाटील यांनी मतदारसंघात महिलांचे संघटन मजबूत करण्यावर केले लक्ष केंद्रित

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे खूपच बदललेली पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कमी मताधिक्य प्राप्त झाले. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार जयंत पाटील हे विजयी झाले. परंतु त्यांच्या विजयाचा टक्का मात्र कमी झालेला पाहायला मिळाला. गेल्या सात निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या मताधिक्याचा टक्का हा वाढतच गेला. परंतु यावेळी मात्र हा मतांचा टक्का घसरल्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

लाडक्या बहिणींचा मताचा टक्का चांगलाच परिणाम करून गेल्यामुळे पाटील यांनी मतदारसंघात महिलांचे संघटन मजबूत करण्यावर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. नुकतीच मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्याची बैठक पार पडली. ही बैठक खेळीमेळीत पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपले लक्ष मतदारसंघावर केंद्रित केलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विशेषतः महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी भर देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असा सूर या बैठकीत होता.