खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची ७५ वी जयंती नुकतीच साजरी झाली. यावेळी विटा येथील तालुका नगर वाचनालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावलेली होती. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन होता. त्यांनी खानापूर आटपाडीसह जिल्ह्याच्या विकासात योगदान दिलेले होते. त्यांच्या पश्चात विकासाला खीळ बसू नये यासाठी आमदार सुहास बाबर आणि मी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही पक्षविरहित एकत्रित काम करणार आहे, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले.
यावेळी आमदार सुहास बाबर, देवदत्त राजोपाध्ये, अॅड. ा बाबासाहेब मुळीक, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, विटा बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष उत्तमराव चोथे उपस्थित होते. खा. पाटील म्हणाले, आमच्या कुटुंबाशी स्व. अनिलभाऊ बाबर यांचे खूप जवळचे संबंध होते. मी त्यांच्या कामाचा आवाका जवळून पाहिलेला आहे. दिवंगत अनिलभाऊ बाबर यांच्याशी असलेला कौटुंबिक जिव्हाळा आमदार सुहास बाबर व अमोल बाबर यांच्या माध्यमातून यापुढेही कायम राहील. असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, दिवंगत अनिलभाऊ बाबर यांचे काम अत्यंत प्रेरणादायी होते. त्यामुळे त्यांचा विकासाचा दृष्टिकोन येणाऱ्या पिढीलाही मार्गदर्शक ठरावा यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीत केलेल्या कामाचा आढावा घेणारे एखादे पुस्तकप्रकाशित करावे.