हातकणंगले तालुक्यात अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळतो. हातकणंगले रुकडी हे आचार्य रत्न १०८ बाहुबली जी महाराज यांचे जन्मगाव असून या गावी प्रथम गणिनी प्रमुख आर्थीका १०५ मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेतून अष्टापद तीर्थ हे नवनिर्मित क्षेत्र साकारत आहे. या क्षेत्रावरती ५१ फुट उंची वरती २७ फूट उंचीची पद्मासनस्थ १००८ भगवान आदिनाथांची मूर्ती विराजमान आहे. तसेच याच क्षेत्रावरती १००८ मुनीसुव्रतनाथ भगवान यांचेही मंदिर साकारत आहे.
या मूर्तीचा पंचकल्याणक महोत्सव भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. रुकडी येथील नवनिर्मित अष्टपद तीर्थ येथे १९ ते २५ जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन केले आहे. हा सोहळा परमपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी, परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ कोल्हापूर, परमपूज्य स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ श्रवणबेळगोळ यांच्यासह अन्य भट्टारक स्वामीजींच्या नेतृत्वात संपन्न होत असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना आमदार अशोक माने यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगून सोहळ्याची रूपरेषा विशद केली.