गावांना पाण्याची गरज मात्र प्रशासन निवडणुकीत व्यस्त!

अलीकडच्या काळात अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पाण्यासाठी खूपच वणवण करावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये सध्या १५ वाड्या वस्त्यांवर सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण करणे, शक्य तिथे नवीन विंधन विहीर घेण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी झाली नसली तरी तयारी मात्र करण्यात आली आहे. कागदावर आराखडा तयार करण्यात आला. काही ठिकाणी रहिवाशांच्या घशाला कोरड पडण्याची वेळ आली आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुकांमुळे तालुका, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात दंग आहेत.

दुष्काळाची स्थिती गडद होत असल्याने नऊ तालुक्यांतील १५ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. येथे टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र आराखड्यातील प्रस्तावित सर्व कामे प्रत्यक्षात सुरू नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासन निवडणुकांच्या कामात दंग राहिल्याने टंचाई निवारण्याच्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी पाठपुरावा होत नाही. अधिकाऱ्यांना गावपातळीवरील पाणी टंचाई पहायलाच गेले नसल्याने दुष्काळाची दाहकता पुरेशा प्रमाणात न कळाल्याने ते प्रस्ताव येऊ दे, पाण्याचे स्त्रोत तपासू, खासगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित करून, नवीन कूपनलिकेची खोदाई करू, असे सांगत आहेत.