इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी यंत्रमाग भरपूर प्रमाणात असल्यामुळे अनेक बाहेरचे लोक कामानिमित्त येऊन या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. इंडोकाऊंटसह निरनिराळ्या व्यवसायातील कापड व्यवसायात काम करणाऱ्या कामगार प्रतिनिधींनी रत्नाप्पाण्णा कुंभार स्पिनिंग मिलवर आ. अशोकराव माने यांचा सत्कार केला.
वस्त्रोद्योगातील कष्टकरी कामगारांच्या निरनिराळ्या मागण्यांसाठी, त्यांच्या शासकीय सवलतीसाठी आणि त्याचबरोबर त्यांचे पुढचे जीवन सुखी व्हावे म्हणून कामगार वर्गाला आणि कष्टकरी जनतेला मी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे, असे उद्गार आमदार डॉ. अशोकराव माने यांनी यावेळी बोलताना काढले. सागर खोत, संदिप बाचणकर आदिंनी आ. माने यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी बोलताना महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी यांनी या सगळ्या भागातील निरनिराळ्या कामगार क्षेत्रातील अडचणींचा आढावा घेतला.
यावेळी इंडोकाऊंटचे निरनिराळ्या प्रतिनिधींनी या भागामध्ये काम करणारे कामगार हे एकत्रीत येत असून ते औद्योगिक शांततेसाठी आणि विकासासाठी एकत्र येत आहेत. अशावेळी कामगार अधिकारी आणि निरनिराळे प्रतिनिधी यांनी आम्हाला सहकार्य देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी संघटना करण्यासच मज्जाव आहे, असा मज्जाव होणे योग्य नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाऊण शतक झाल्यानंतर सुद्धा संघटनेच्या बाबतीत अडचणी येत असतील तर ती परिस्थिती चिंताजनक आहे.
त्यामुळेच कामगारांना संघटना करण्याचा अधिकार असला पाहिजे, आम्ही उद्योगाच्या हितासाठी वरिष्ठांचा मान राखून कामगार संघटना बांधत असताना आमदार मानेंनी आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी निरनिराळ्या व्यवसायातील अनेक कामगार कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नाप्पाण्णा कुंभार स्पिनिंग मिलवर निरनिराळ्य कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. त्यावेळी आम. माने यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
