आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या सूचना संबंधित पाळणार का? सर्वांच्याच लागल्या नजरा


खानापूर तालुक्यातील आळसंद येथे प्रत्येकी 11 लाख असे एकूण 44 लाखांच्या अंगणवाडी शाळा खोल्या स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आल्या त्यांचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. सरपंच अजित जाधव यांनी या शाळा खोल्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता हीच शाळा या मुलांसाठी धोकादायक बनली आहे. या शाळेच्या ठिकाणी एक आड आहे. या आडात कायम पाणी असते. शाळेची पायरी उतरल्यानंतर लगेचच आड असल्याने लहान मुले या ठिकाणी खेळत असतात.

या अडाची संरक्षक भिंत म्हणावी तितकी उंच नाही त्यामुळे हा आड धोकादायक ठरत आहे. ज्यावेळी या शाळांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळेस या आडाच्यावर जाळी मारून घ्यावी अशा सूचना आमदार सुहास बाबर यांनी संबंधितांना दिल्या होत्या. परंतु गेले अनेक महिने झाले याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
असे असताना दुसरा एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. या आडाभोवतीच्या कोरीव दगडांचे काम चालू आहे. त्या ठिकाणी याच ठिकाणाहून असणाऱ्या वीजपेटीतून विद्युत प्रवाह असणाऱ्या केबल उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत तर त्यांना केव्हाही विजेचा धक्का बसू शकतो. तसेच इतर कोरीव दगडांचे काम चालू आहे. त्याचा देखील त्रास या चिमुकल्याना होऊ शकतो. याकडे मात्र अनेकांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.

एकीकडे लोकार्पण सोहळा धुमधडाक्यात झाला असताना दुसरीकडे मात्र या मुलांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. एखादी घटना घडल्यानंतर संबंधितांना जाग येणार का? असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत आहेत. या आडाभोवती संरक्षक जाळी मारणे गरजेचे आहे. चालू असलेले कामही तेही योग्य पद्धतीने नियोजन करून करावे अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार का? आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या सूचना आता तरी संबंधित पाळणार का? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.