वाळव्यात ऊसतोड महिलेचा बैलगाडीच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू; छातीवरून गाडीचे चाक गेले…

सध्या सगळीकडे ऊसतोड सुरु आहे. अनेक ठिकाणी ऊसतोड कामगार ऊसतोड करत असल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी मशीन च्या साहाय्याने शेतकरी ऊसतोड करत आहेत. ऊसतोड सुरु असल्याने वाहतूक कोंडी देखील पहायला मिळत आहे. वाळवा येथून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाळवा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका ऊस तोडणी महिला मजुराचा मृत्यू झाला. दैवशाला बाळासाहेब आंधळे (वय ३७, मूळ आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या वाळवा) असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेचा पती बाळासाहेब रामकिसन आंधळे याच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. याबाबतची फिर्याद चुलत भाऊ अशोक व्यंकट आंधळे (वय ४२, मूळ आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या वाळवा) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळासाहेब आंधळे, दैवशाला आंधळे उसाने भरलेली बैलगाडी (बैलगाडी २७२) वाळवा येथील नेमिनाथ नगरहून कारखान्याकडे नेत असताना उतार असणाऱ्या रस्त्यावरून उजव्या बाजूला वळण घेत असताना उसाने भरलेल्या बैलगाडीवर मागे बसलेली दैवशाला या बैलगाडीतून घसरून डाव्या बाजूच्या बैलगाडीच्या चाकाखाली पडल्या.

अपघातात दैवशाला यांच्या छातीवरून बैलगाडीचे चाक जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून सायंकाळी ६.३० च्या सुमारास उपचारांपूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिस तपास करीत आहेत.