सद्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना पहायला मिळत आहे. लोकसभेबरोबरच खानापूर-आटपाडी विधानसभा पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू आहेत. आमदार अनिल बाबर यांचे अकाली निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर स्व. बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे.
कोल्हापूरमधील शिवसेना अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली चर्चा याचे संकेत देत असून आगामी काळात बाबर घराण्यातूनच खानापूर-आटपाडीचा भावी वारसदार मिळण्याची चिन्हे सद्यस्थितीत दिसत आहेत.
स्व. अनिल बाबर यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. शेताच्या बांधावर जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत या भागाचा कृषी विकास शक्य नाही हे ओळखून त्यांनी टेंभू योजनेसाठी राजकीय ताकद वापरून गती देण्याचा प्रयत्न केला.
यामुळेच त्यांना पाणीदार आमदार अशी उपाधी जनतेने दिली. याच घराण्यातील वारसदार पुढचा प्रतिनिधी असणे सामान्यांनी गृहित धरले असले तरी बाबर यांना झालेला राजकीय विरोधही दुर्लक्ष करून चालणार नाही.