आटपाडी शहरात भीतीचे वातावरण! टोळक्याची दहशत

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे.अशीच दहशत आटपाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री एका गावातून दोन आलिशान चारचाकीतून आलेल्या सशस्त्र टोळक्याकडून या युवकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हत्यारांसह टोळके पाहून या थरारक घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आटपाडी बसस्थानक परिसरात रात्री दहशतीचा थरार नागरिकांनी अनुभवला.

मात्र हल्ला होणार असल्याच्या शक्यतेने युवकांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याने मोठा अनर्थ टळला. याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी टोळके वाहनासह पसार झाले. या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी बसने ये-जा करत असतात. येथे टवाळखोर युवक सातत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे वेगाने गाडी पळवणे, अश्लील हावभाव करणे, किरकोळ कारणातून भांडणाचे प्रकार वाढले आहेत.

पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरासह शहरातील सर्वच मुख्य चौकात अशा टवाळखोरांचा त्रास होत आहे. आटपाडी शहरात वाढत्या टवाळखोरीला आळा घालण्यासाठी चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नागरिक करत आहेत.