मोटारीची काच फोडून दीड लाखाची पळविली पर्स , गुन्हा दाखल

सध्या चोरी, खुन, मारामारी, अश्या गुन्हेगारी प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या चोरीमुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. असाच एक चोरीचा प्रकार इचलकरंजी शहरात उघडकीस आलेला आहे. महिला डॉक्टरच्या चारचाकी वाहनाची काच फोडून रोख दीड लाख रुपये असलेली पर्स चोरट्याने चोरून नेली. ही घटना अलायन्स हॉस्पिटलच्या भिंतीलागत असणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (ता.१५) रात्री साडेसातला घडली.

डॉ.संध्या सारंग ढवळे (वय ४२ रा. वीरशैव बॅंकेजवळ, इचलकरंजी) यांच्या फिर्यादीनुसार याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हॉटेल सेंट्रल पार्कमधून डॉ. संध्या ढवळे यांनी भिशीतून मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम पर्समध्ये ठेवून चारचाकी वाहनातून नाटकाच्या सरावासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आल्या. यावेळी पर्स सोबत ठेवली. त्यानंतर स्वतःच्या दवाखान्यातील जमा झालेली ५० हजार रुपयांची रोख रक्कम त्या पर्समध्ये ठेवली.

थोड्या वेळानंतर अलायन्स हॉस्पिटलमधून फिजीओथेरपीसाठी कॉल आल्यानंतर पैशाची पर्स घेऊन चारचाकी वाहनातून त्या रुग्णालयात गेल्या. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पैशाची पर्स बाजूच्या सिटखाली ठेवून चारचाकी वाहन रुग्णालयाच्या भिंतीलगत रस्त्यावर पार्किंग केली. त्यानंतर रुग्णालयातील काम संपवून वाहनाजवळ आल्यानंतर चालकाच्या बाजूच्या काच फोडलेली दिसून आली.

तसेच वाहनात ठेवलेली पैशाची पर्स मिळून आली नाही. पर्सचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तरीही पर्स सापडली नाही. भिशीतून आलेले रोख १ लाख रुपये व दवाखान्यातून गोळा झालेले ५० हजार रुपये असे रोख दीड लाख रुपये व इतर कागदपत्रे असलेली पर्स चारचाकी वाहनाची काच फोडून चोरीला गेल्याची फिर्याद डॉ. ढवळे यांनी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.