इचलकरंजीकर तहानलेलेच राहणार का? इचलकरंजीचा सुळकूड पाणी योजनेचा प्रश्न निवडणुकीनंतर झाला गायब……

इचलकरंजी शहरातील पाण्याची टंचाई हि सर्वानाच माहिती आहे. पाण्याचा प्रश्न हा खूपच जगजाहीर आहे. शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हा पाणी प्रश्न सुटणार तर कधी? हा प्रश्न प्रत्येकाला पडलेलाच आहे. मंत्र्यांसह अनेक राजकीय मंडळींनी इचलकरंजीला पाणी देण्याबाबत जाहीरपणे मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या पण त्यानंतरही सध्या या प्रश्नावर कोणीही ठोस बोलण्यास तयार नाही. त्यामुळे पुढील काळातही इचलकरंजीचा पाणी पश्न असाच राजकारणात गुरफटत राहण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी, दोन दशकाच्या संघर्षानंतरही इचलकरंजीवासीयांच्या वाट्याला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याची शक्यता अधिक धूसर दिसत आहे.

तत्कालीन पालकमंत्री विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीला पाणी देण्याबाबत गंभीर वक्तव्य केले होते. नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. आता ते एक जबाबदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी सुळकूड पाणी योजनेप्रश्नी पुढाकार घेऊन मार्ग काढणार काय, याची इचलकरंजीकरांना प्रतीक्षा लागली आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातल्यास हा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघण्यास मदत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरात कृती समिती स्थापन करीत पाणी प्रश्न पेटता ठेवला होता. त्यातून नागरिकांत जागृती करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र सध्या या प्रश्नावरील चर्चाच थांबली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याप्रश्नी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नाचा जाब राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला विचारावा लागणार आहे. तरच पुढील काळात या प्रश्नाल गती मिळणार आहे. इचलकरंजीचे राजकारण हे नेहमीच पाण्याभोवती फिरत राहिले आहे. लोकसभा असेल अथवा विधानसभा निवडणूक असेल, प्रत्येकवेळी पाणी योजनेचा मुद्दा चर्चेत येतो. ढीगभर आश्वासने दिली जातात.

निवडणुका झाल्या की या प्रश्नाची धार कमी होत जाते. निवडणूक आली की हा प्रश्न पुन्हा तापतो. दोन दशके हा प्रकार सुरू आहे. त्याचा अनेक राजकीय नेत्यांना फटका बसला, तर काहीजणांना फायदाही झाला; पण हा प्रश्न मात्र तसाच राहिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत संवेदनशील बनलेला इचलकरंजीचा सुळकूड पाणी योजनेचा प्रश्न निवडणुकीनंतर मात्र गायब झाला आहे. सध्या या प्रश्नावर कोणतीच चर्चा होत नसल्यामुळे सुळकूड योजनेचे पुढे काय झाले, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.