विट्यात भीषण अपघातात तीन जखमी, एक गंभीर; दोन्ही वाहनांचा चुराडा

विटा नेवरी रस्त्यावर चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कवठेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले हे आपल्या निशान कंपनीच्या मॅग्रेट या कारमधून साताऱ्याकडून विट्या कडे जात होते. तर याचवेळी विकास सरनोबत ( राहणार भूषणगड, जिल्हा सातारा ) हे आपल्या बलेनो कार मधून कुटुंबासह विट्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. या दोन्ही वाहनांची विट्यातील शिवाजीनगर पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावर धडक झाली.

समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा होऊन त्याचे पार्ट रस्त्यावर विखुरले होते. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दगडू सुदामा सरनोबत (वय ८२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच स्वाती विकास सरनोबत ( वय ४०) आणि वैष्णवी विकास सरनोबत ( २२) या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर जितेंद्र आठवले यांनी तातडीने जखमींना अॅम्बुलन्स मधून रुग्णालयात पाठवले. एअर बॅग उघडल्यामुळे अपघातातील दोन्ही वाहनांचे चालक जितेंद्र आठवले आणि विकास सरनोबत यांना विशेष दुखापत झाली नाही. विटा नेवरी रस्त्यावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून देखील केवळ अनियंत्रित वेगामुळे अपघाताची मालिका सुरूच असल्याची दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.