सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर…

सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोण, या चर्चेला अखेर शनिवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. चंद्रकांत पाटील यांची सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वीही २०१४ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ते सांगलीचे पालकमंत्री होते. महापालिका, जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सांगली जिल्ह्याने महायुतीला ५ आमदार दिले, मात्र जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व बीडचे पालकमंत्री असतील.

सांगली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आली असून महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही रणनीती भाजपची मानली जात आहे. यापुर्वी दादांनी काही काळ सांगली जिल्ह्याचे पालकत्व सांभाळले असून त्यांचा एक गटही जिल्ह्यात आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांना आयात करून त्यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत यश मिळवून दाखवले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात भाजपचाच पालकमंत्री असूनही पक्ष विस्तारासाठी फारसे प्रयत्न झाले असे म्हणता येणार नाही.